औरंगाबाद - इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या २० फुटी खड्यात पडून ५० वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी शिवाजीनगर येथे घडली आहे. या दुर्घटनेत जालन्यातील नुतनवसाहत येथील शंमशौन रॉबर्ट उगले (५०) यांचा मृत्यू झाला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, उगले हे शुक्रवारी
सकाळी कामानिमित्त जालना येथून औरंगाबादला आले होते. शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या
इमारत बांधकामावर मजूर म्हणून ते काम करत होते. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या
सुमारास लिफ्टच्या खड्याचे काम सुरू असताना अचानक उगले यांचा तोल जाऊन ते खड्यात
पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. उगले यांना गंभीर जखम आवस्थेत सहकारी
कामगारांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली
होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
आहे. पुढील तपास हवालदार एल बी हिंगे
करीत आहेत.












